धार्मिक गड, सप्ताह या माध्यमातून होणारी लूट थांबली पाहिजे
गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात धार्मिक गडांच्या माध्यमातून गावच्या गाव लुटली जाताहेत. अखंड हरीनाम नारळी सप्ताह आणि गावोगाव होणारे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह हे बीड जिल्ह्यात बारमाही सुरु असतात. याचाच एक भाग असलेल्या आमच्या छोट्याश्या १७००-१८०० लोकसंख्या असलेल्या . गावात धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडाच्या वार्षिक सप्ताहाची आज समाप्ती झाली. ४ वर्षापूर्वी याच गडाचा फिरता नारळी सप्ताह गावात झाला होता. जवळपास ८० लाख रुपये वर्गणी जमा केली होती. तसेच ९ वर्षापूर्वी गडाच्या बांधकामासाठी एका तासात गावाने १५-१६ लाख रुपये रोख देणगी जमा करुन दिली होती. त्यात हे वार्षिक सप्ताहासाठी ३ ते ४ लाख रुपये दरवर्षी खर्च होतातच.
मुद्दा वर्गणी देण्याचा नाहीच, मुद्दा कर्जबाजारीपणा असणाऱ्या, ऊसतोडमजूर असणाऱ्या शेतात जाण्याच्या रस्त्यांचा प्रश्न असणाऱ्या, २० लाखापेक्षा जास्त रुपयांची वीजबिल थकबाकी असणाऱ्या, वीजचोरी करणाऱ्या, एक एक महिना अंधारात राहणाऱ्या शिक्षणाचा प्रश्न असणाऱ्या आरोग्याचा प्रश्न असणाऱ्या, बेरोजगारीचा प्रश्न असणाऱ्या गावाने लाखो रुपये वर्गणी देण्याचा मुद्दा आहे.
खरंतर अशी वर्गणी गोळा करणं म्हणजे खंडणी वसूल करणे आहे. देणगी देण्याला आक्षेप असणार नाही मात्र वर्गणी देण्याला आक्षेप असलाच पाहिजे. कारण स्व इच्छेने जेवढी देतील तेवढी घेणं म्हणजे देणगी आणि घरातील प्रतिमानसी, प्रति एकर हे निकष लावून ठरवून देऊन बळजबरीने रक्कम वसूल करण म्हणजे वर्गणी जी एक प्रकारे खंडणीच आहे.
हा मुद्दा ४ वर्षापूर्वीच्या फिरत्या नारळी सप्ताहाच्यावेळी वृत्तपत्रामध्ये बातमी देऊन पुढं आणला होता. ज्यामुळे ६ महिने मी गावात जाऊ शकलो नव्हतो. आईवडिलांना गावाने मानसिकरित्या एवढा त्रास दिला होता की अजूनही त्यातून मानसिकरित्या पूर्णपणे बाहेर निघालेले नाहीत, अजून मी घरी जाण्यासाठी स्वतःला रोखतोय. त्यावेळी मला जिवे मारण्यासाठी, मला शोधण्यासाठी माझ्यामागे गाड्या फिरत होत्या. आता गादीवर असलेले स्वयंघोषित महंत माझ्या बातमीमुळे बदनामी झाली म्हणून रडले (नाटकीपणाने) होते म्हणे. आणि त्यांनी त्यावेळी गावात होणारा फिरता नारळी सप्ताह नाकारला म्हणून गावातील लोक तीन दिवस उपाशी राहून गावाला सप्ताह देण्यासाठी तथाकथित महाराजांची विनवणी करत होते. मला त्यावेळेस वाटेल त्या युक्त्या वापरुन माझ्यावर दडपण आणून माफी मागण्यासाठी प्रवृत्त करत होते. जिल्ह्यातल्या अनेक राजकीय नेत्यांनीही माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेवटपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम राहून कुणाचीही माफी मागितली नाही. कारण मी कोणतंही चूकीच आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नव्हतं.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" हा तुकोबांचा अभंग विसरलेल्या दांभिक लोकांनी फिरत्या वार्षिक नारळी सप्ताहासाठी सलग तीन वर्ष दुष्काळ असतानाही २५० पेक्षा जास्त मोठं मोठ्या हिरव्या झाडांची कत्तल केली होती. आणि साधारणतः २ कोटी रुपये (वर्गणी आणि सप्ताहाचा निमित्ताने केलेला इतर वैयक्तिक खर्च) सात दिवसासाठी खर्च केले होते आज पन्हा वार्षिक सप्ताहाच्या समाप्तीदिवशी तथाकथित परमपूज्य महंत असणाऱ्या महाराजांनी गावाकडून सोन्याची अंगठी घालून घेतलीय. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यापासून संत अलिप्त असतात असं म्हणतात. मात्र तथाकथित स्वयंघोषित ह. भ. प. प. पु. गुरुवर्य महंत कीर्तनासाठी गेल्यावर सोन्याची अंगठी घालून घेतात तेही स्वतः कीर्तन न करताच. काय म्हणावं अश्या तथाकथित महंताला?
तुकाराम महाराज कीर्तनकारानी कसं आचरण करावं हे त्यांच्या ११३० क्रमांकाच्या अभंगात सांगतात. तो अभंग म्हणजे जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे | बुका लावू नये भाळा | माळ घालू नये गळा | तट्टावृषभासी दाणा । तृण मागो नये जना । तुका म्हणे द्रव्य घेती | देती तेही नरका जाती ॥
या अभंगात तुकोबा सांगतात की किर्तनकाराने कीर्तनासाठी गेल्यावर तिथे जेवू नये. बुका लाऊन घेऊ नये. गळ्यात हार घालून घेऊ नये, स्वतःसाठी जेवनच काय पण वाहतुकिच्या बैल किंवा घोड्यासाठी चाराही मागू नये. (त्याकाळी प्रवासासाठी बैल/घोडा गाडीचा उपयोग केला जायचा). कथा, कीर्तन व अध्यात्मिक बुवाबाबांनी जो धंदा मांडलाय त्यांचा निषेध करताना तुकोबा अशा लोकांनी पैसे घेणे व त्यांना पैसे देनारेही नरकात जातिल असे म्हणतात.
पण आजचे कीर्तनकार तुकोबांच नाव घेऊन सर्रास जनतेला लुटतात. Endeavour/ Fortuner सारख्या लाखो रुपयांच्या गाडीतून हे महाराज येतात. त्यांना जेवणासाठी पंचपकवानाची वेगळी सोय करावी लागते. आणि शेवटी स्वतः हून मागवून पाकीट घेतात. किती विरोधाभास आहे. कुठं थांबणार आहे हे? खरंतर थांबण्याऐवजी हा प्रकार वाढत चाललाय आणि गोर गरीब कष्टकरी समाज देवाधर्माच्या नावाने लुटला जावून आर्थिक दारिद्रयात खितपत पडलाय.
बीड जिल्हा हा धार्मिक गडांचा जिल्हा आहे. जवळपास १४ धार्मिक गड एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. आणि प्रत्येक गडाने आजूबाजूच्या गावांना घेरुन धंदा मांडलाय.
आजकाल तर या गडांवरुन राजकारण देखील होऊ लागलय. विशेष म्हणजे या गडांच्या विश्वस्तांच्या कमिटीमध्ये सगळे राजकीय लोकं आहेत. यावर कुणीच बोलू शकत नाही आणि बोलणार देखील नाही. एवढंच काय या पोस्टमुळे अनेकजण चवतळणार आहेत याची मला पुर्ण खात्री आहे. असो, अश्याना मी आजपर्यंत कधी भिक घातली नाही पुढेही घालणार नाही. असो, अनेक चांगल्या-वाईट बाबी या धार्मिक गडांच्या आडून घडतात. त्या पुढे क्रमशः लिहीत राहिल.
पण शेवटीं पुन्हा काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात, विद्रोही तुकाराम महाराज कधी समजून घेतील ही लोकं ? राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज कधी वाचतील ही लोकं ?
एवढंच काय, वारकरी संप्रदायाचा खरा इतिहास तरी समजून घेतील की नाही ही लोकं ?
- रामहरी मोरे
( जीवन कदम गजमल यांच्या वॉलवरून साभार )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत