Header Ads

सर्पराज्ञी नैसर्गिकरीत्या जागच्या जागीच कंदील पुष्पाचे जतन करणार !



सर्पराज्ञी नैसर्गिकरीत्या जागच्या जागीच कंदील पुष्पाचे जतन करणार

शिरूर कासार | प्रतिनिधी
जागतिक दृष्ट्या दिवसेंदिवस दुर्मिळ अति दुर्मिळ होत चाललेल्या कंदील पुष्पाचे अस्तित्व  सर्पराज्ञीच्या माळरानावर दिसून आले आहे. यामुळे निसर्ग प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या  कंदील पुष्पाची पहाणी राज्य वन्यजीव महामंडळाचे  सदस्य निसर्ग मित्र सुहास वायंगणकर यांनी  केली. त्यांच्या समवेत सह्याद्री देवराईचे निसर्ग मित्र लालासो माने हे ही होते. या नैसर्गिक रित्या आढळून आलेल्या कंदील पुष्पाचे जागच्या जागी नैसर्गिकरित्या संरक्षण संवर्धन आणि जतन सर्पराज्ञी करणार आहे.

जगातील दुर्मिळ वनस्पती पैकी एक वनस्पती म्हणून कंदील पुष्पाकडे पाहिले जाते. कंदीलपुष्प  किंवा सेरोपजियाच्या जगात जवळपास २३५ जाती आढळून येतात. भारतात त्यापैकी ४० जाती आढळून येतात. महाराष्ट्रात किमान २५ ते २६ जाती आढळून येत असाव्यात .कंदील पुष्पच्या काही प्रजाती ह्या काही वेली  तर काही खुरटे झुडपे असतात. कंदील पुष्पा मध्ये पानांचा आकार प्रजातीच्या व उपप्रजातीप्रमाणे वेगवेगळ्या पहावयास मिळतो. काहींची पाने लांब कणेरीच्या पानासारखी तर काहींची अंड गोलाकार जाड देठहीन ते देठ असणारी असतात.फुले कंदीला सारखी जळत्या मेणबत्ती सारखी  दिसतात म्हणून त्याला कंदील पुष्प म्हणतात. फुले ऑक्टोबर ते जानेवारीच्या आसपास येतात .
     सर्पराज्ञीत  आढळुन आलेले कंदील पुष्प हे Ceropegia bulbosa var lushii व त्याची उपप्रजाती Ceropegia bulbosa var bulbosa असल्याचे औरंगाबाद येथील वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी यांनी सांगितले .या प्रजातीचे नैसर्गिक अधिवासात एकूण सहा वेली सर्पराज्ञीत सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांना आढळून आल्या आहेत.  त्यापैकी लांब पानाची एक  तर  पाच वेली ह्या गोलाकार अंडाकृती पानाच्या आहेत.
      
 नैसर्गिक रित्या जागच्या जागीच कंदील पुष्पाचे जतन करणार

कंदील पुष्प हे खाद्य वनस्पती व औषधी असल्याने उजाड माळरानावर आढळून येणारे ही वनस्पती दिवसेंदिवस मोकाट गुरे चराई व मानवाने,गुराख्याने जमिनीतुन त्याचे  कंद उकरून   खाल्ल्यामुळे दिवसेंदिवस कमी कमी होत दुर्मिळ अतिदुर्मिळ झाली  आहे . या वनस्पतीस गुराखी हमन ,हनुमान बटाटा या नावाने ओळखतात. आता ती जगभरात दुर्मिळ झाली असून या वनस्पतीचे सर्पराज्ञीत ज्या जागी ती उगवली आहे तिथेच त्याचे संरक्षण संवर्धन आणि जतन करणार  असल्याचे सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.