शिरूर कासार मध्ये 'कटप्पा बाहुबली'चे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल
नगर पंचायत सभापती निवडी नंतर पोस्ट होत आहेत व्हायरल
----
कटप्पा आणि बाहुबली कोण?
शिरूर कासार : कटप्पा ने बाहुबलीस कपटाने मारल्याचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज शिरूर कासार नगरपंचायतीच्या सभापती पदाच्या निवडी पार पडल्यानंतर या निवडणुकीचा संदर्भ देत या पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
"कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा ?" अशा आशयाची जाहिरात बीडच्या विविध वर्तमानपत्रांमध्ये सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रकाशीत झाल्या होत्या. आज पुन्हा या जाहिरातीची आठवण शिरूर कासार च्या जनतेला झाली आहे. आज (दि. 23) शिरूर कासार नगर पंचायत च्या विविध समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी होत्या. या निवडीमध्ये दगाफटका झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी सोशल मीडियातून विरोधकांवर कटप्पा- बाहुबलीच्या पोस्ट द्वारे निशाणा साधला आहे.
नुकत्याच झालेल्या शिरूर कासार नगर पंचायत मध्ये भाजपाच्या सुरेश धस गटाने अकरा जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मुस्लिम बहुल वार्डातील फक्त चार जागा जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपाकडे सत्तास्थापनेसाठी स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेशी युती केली आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊ नये म्हणून शिवसेनेस एक स्वीकृत नगरसेवक व दोन समित्यांचे सभापती पदे देऊ केले होते. त्यामुळे फक्त दोन सदस्य निवडून येऊन देखील सत्तेत मोठा वाटा मिळाला असल्याने शिवसेना कार्यकर्ते मोठ्या आनंदात होते. काल झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत स्वीकृत नगरसेवक घेण्याबाबतचा शब्द भाजपाने पाळला देखील आहे. मात्र, आज झालेल्या सभापती निवडीत दिलेला शब्द पाळला गेलेला नाही. एकही सभापतिपद भाजपाने शिवसेनेस दिले नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कटप्पा आणि बाहुबली चे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करत भाजपावर निशाणा साधला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत