Header Ads

शिरूरकासार येथील लोकन्यायालयात ३७१ प्रकरणे निकाली; १०,३३,९१७ रुपयांची वसुली

प्रलंबित निकाली प्रकरणात शिरूरचा प्रथम क्रमांक
शिरूर कासार | प्रतिनिधी 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार दि. १२ मार्च २०२२ रोजी शिरूर कासार येथील  न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३७१ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर एकूण १०,३३,९१७/- रुपयांची वसुली झाली आहे. प्रलंबित खटले निकाली काढण्यात शिरूर न्यायालयाचा सलग चौथ्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असल्याची   माहिती  येथील विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा  न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी दिली आहे.

उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार  व  जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे,दाखल पूर्व प्रकरण,बँकेची कर्ज प्रकरणे, चेक बाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर पंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद , पोटगीची प्रकरणे, आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन कोविड १९ या आजाराच्या बाबतीत असणाऱ्या सर्व नियमावलीचे पालन करून करण्यात आले होते. त्यामध्ये ६३८ दिवाणी प्रकरणा पैकी २७३, फौजदारी तडजोडपात्र ११६ पैकी ९ , धनादेश (चेक) १०८ पैकी ३, एस.बी.आय.बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विविध बँकेच्या कर्ज वसुलीसाठी दाखलपूर्व प्रकरणे व पंचायत समिती, ग्रामपंचायतची वसुली ३९० पैकी ६० असे मिळून एकूण ३७१ प्रकरणाचा तडजोडी आधारे निपटारा करण्यात आला. तर दाखल पूर्व प्रकरणात एस.बी.आय.बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँक,व इतर बँक व ग्रामपंचायत व गुन्हा कबुली खटले अशी  एकूण १०,३३,९१७/- रुपयांची वसुली झाली आहे. या लोकन्यायालयात एकूण १४०० प्रकरणे ठेवण्यात आली होती. यावेळी पक्षकारांनी व वकील बांधवांनी आपली न्यायालयात दाखल असलेली व दाखल पूर्व प्रकरणे हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसात तडजोड करून घेऊन लोकन्यायालय हे ऊत्तम रीत्या यशस्वी पार पाडले. 

 न्यायालयात येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे,आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँड सॅनिटाझरने हात स्वच्छ धुवूनच प्रवेश करणे अशा नियमांचे पालन करण्यात आले यावेळी पक्षकारास अचानक आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारी यांचा कॅम्प लावण्यात आला होता. तसेच शिरूर पोलीस स्टेशन मार्फत योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी मंडपची व्यवस्था करण्यात आली होती.अशी माहिती न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी दिली आहे. या लोकन्यायालयासाठी ४ न्यायाधीशांचे पॅनल तयार करण्यात आले होते त्यात पॅनल क्रमांक १ प्रमुख न्यायाधीश ए. टी. मनगिरे ,सदस्य समिर पठाण , डी. जे.कोठुळे, पॅनल क्रमांक २ प्रमुख न्यायाधीश पी. बी. देशपांडे, सदस्य एस.एन.मुरकुटे, जि. एच सानप, पॅनल क्रमांक ३ प्रमुख न्यायाधीश श्रीमती व्ही.ए. देसाई , सदस्य श्रीमती जोत्स्ना तवटे, डॉ. प्रीती बडे, पॅनल ४ प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस. एम.जोशी सदस्य श्रीमती एस. एस.जायभाये, कुमारी निता दराडे यांनी काम पाहिले . या लोकन्यायालयाच्या यशस्वीतेत्यासाठी न्यायाधीश अमितकुमार मनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वकीलसंघ , न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक व न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग नगरपंचायत, पंचायत समिती, तहसिल कार्यालय यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.