Header Ads

राग : धर्म त्यागाचा की २२ प्रतिज्ञांचा


-----
| युवराज सोनवणे

हिंदूंचा राग आता ज्वालामुखी सारखा उफाळू लागला आहे, असे हिंदुत्ववादी मुस्लिमांना आरोपीच्या कठड्यात उभे करून नेहमी ओरडत असतात. मात्र, आता हिंदू धर्मातील अनेक लोकांचा राग ज्वालामुखी सारखा ऊफाळून आला आहे. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्म सोडण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येने लोक धर्म सोडून जावू लागल्याने धर्मसत्ताच नव्हे तर राजसत्ता ही हादरून गेली आहे. एका धर्म त्यागाच्या सोहळ्यातील २२ प्रतिज्ञा देखील वादाचा विषय बनवला गेला आहे. पण , मुख्य प्रश्न हा आहे की,  हे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्म का सोडत आहेत ? 

हिंदू म्हणजे शांत... हिंदू म्हणजे सहिष्णू.. असच नेहमी चित्र रंगवले जाते. मात्र, हे चित्र खरे आहे काय ? आणि असे जर असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 ला हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला असतात काय ? व्यवस्थेने पिचलेल्या नाकारलेल्या जात समूहाने तेव्हा (1956 ला) धर्मांतर केले होते. आणि आजही तोच समूह हिंदू धर्म सोडून जात आहे. हिंदू धर्म सोडून जात असलेल्या जात समूहाचा राग 1956 मध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न झालेला नाही, आणि आजही होत नाही. हे कटू सत्य मान्य करावेच लागते. 

जात ही हिंदू धर्मास लागलेले कीड आहे. नव्हे तर जातीने हिंदू धर्मास नासवलेले आहे. या जात व्यवस्थेस धर्मग्रंथाची देखील मान्यता आहे. त्यामुळेच विषमतेला मान्यता देणारा मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी जाळला होता.

 खरे तर, हिंदू धर्माने लाखो करोडो लोकांच्या जाणीवाच मारून टाकलेल्या आहेत. मात्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाजलेल्या प्रज्ञेमुळे हळूहळू का होईनात, पण, अनेकांच्या जाणिवा जागृत होऊ लागल्या आहेत. आणि ते त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध बंड करू लागले आहेत. या बंडातील एक महत्त्वाचे हत्यार धर्मांतर ( धम्म दीक्षा ) हे आहे आणि ते हत्यार देखील बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेले आहे.

भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. भारताच्या संविधानाने भारतीय नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय देण्याची आश्वासन दिलेले आहे. दर्जाची व संधीची समानता प्रदान करण्याचे देखील वचन दिलेले आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत हे नमूद आहे. मात्र, भारतीय संविधान नाकारणाऱ्या देशद्रोही वृत्तींना हे वचन पाळावे असे कसे वाटेल ? आणि संविधान प्रेमी त्यांच्याकडून ही अपेक्षा तरी कशी ठेवणार ?  संविधान विरोधी लोक संविधानाला विरोध करताना धर्माचा स्वरक्षणासाठीआधार घेतात. धर्माचा आधार घेऊनच मानसास हिन लेखून छळतात. या छळाचा पाया 'जात' हाच असतो. जातीमुळे छळले जाणारे, पिळले जाणारे लोक जेव्हा त्यांना या छळाची जाणीव होते, तेव्हा या छळातून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. आणि हा शोध शेवटी बुद्ध आणि आंबेडकरांजवळ येऊन थांबतो.

 हिंदुत्ववाद्यांना त्यांचे जे कोणी महापुरुष आहेत असे वाटते. त्यांनी हिंदूंच्या प्रगतीसाठी काही केले आहे काय ? संबंध मानव प्राण्याच्या उत्कर्षाचा, प्रगतीचा मार्ग त्यांनी दाखवला आहे काय ?  जात सोडून हिंदू म्हणून एकत्र या., असे ओरडून सांगणे वेगळे. आणि त्यांच्या प्रगतीसाठी, समतेसाठी काम करणे वेगळे.  एकाही हिंदुत्ववादी महापुरुषाने आतापर्यंत प्रगतीचा पाया असलेले 'शिक्षण' घ्यावे असे म्हटले आहे काय ?  या उलट शूद्रांना, स्रियांना  शिक्षण बंदी घालणाऱ्या धर्मग्रंथांना पूज्य मानलेले आहे. बाबासाहेबांनी अशा विषमता प्रस्थापित करणाऱ्या धर्मग्रंथाची होळी करून समतावादी धम्माची चळवळ सुरू केलेली आहे. देव, आत्मा, स्वर्ग आणि नरक या संकल्पना धर्मात असतात. या संकल्पनांच्या महाजालातून माणसाने बाहेर  पडूच नये, अशी व्यवस्था धर्म संस्थेने करून ठेवलेली आहे. ही धर्म संस्था अशीच अबाधित रहावी म्हणून टिळक, सावरकर, गोडसे, आदींनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी हिंदुत्वाचे रक्षक म्हणून स्वतःची प्रतिमा हिंदूंमध्ये लोकप्रिय करून घेतलेले आहे. परंतु, मानवाचे उत्कर्षक म्हणून त्यांचे काम आहे काय ?

येथे पूर्वापार चालत आलेली जात प्रथा. त्यातून जात वर्चस्वाचा, जात शुद्धतेचा, वंश शुद्धतेचा अहंभाव वारंवार वाढवला जाणे. त्यातून माणुसकी हद्दपार करणे. हे सातत्याने चालू आहे. माणसाला माणुसकी शिकवण्याचा प्रयत्न हजारो वर्षापासून होत आहे. बुद्ध, महावीर, तुकाराम, बसवेश्वर, आदींनी माणुसकीच्या पेरणीसाठी देह झीजवलेला आहे. माणुसकी शिकवण्यासाठीच वेगवेगळ्या धर्माची निर्मिती त्यांनी केलेली आहे. पाप, पुण्याची कल्पना निर्माण करण्यात आली. ईश्वराची भीती देखील दाखवण्यात आली. मात्र, मानव अद्यापही माणुसकी शिकलेला नाही. उलट माणुसकीला हरताळ फासण्यासाठी धर्माचा वापर करू लागला आहे, असे खेदाने म्हणावे लागते. 

माणसाच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत शोषणाची व्यवस्था थांबणार नाही. दुःखाची व्यवस्था थांबणार नाही. माणुसकीचे, नीतीचे जग निर्माण होणार नाही. त्यामुळेच बाबासाहेबांनी सांगितले, बुद्धाच्या मार्गाशिवाय, धम्माशिवाय दुसरा मार्ग नाही. हिंदू धर्म ही अत्याचारी व्यवस्था आहे. जातीच्या नावाने, रूढी - परंपराच्या नावाने शोषण करणारी व्यवस्था आहे. माणसाला गुलाम करणारी व्यवस्था आहे. इथल्या आर्थिक व्यवस्थेपासून देखील वंचित ठेवण्याची त्यात तरतूद आहे. त्यामुळे अनेक लोक याचा निषेध करत आहेत. विरोध करत आहेत. हा विरोध शाहू - फुले - आंबेडकरांनीच नव्हे तर भेदाभेद अमंगळ म्हणत संतांनीही केलेला आहे. आता हा विरोध कृतीत उतरू लागला आहे. समतावादी समाज निर्माण करण्याची व्यवस्था प्रबळ होऊ लागली आहे. ही समतावादी व्यवस्था बौद्ध धम्मात असल्याने बौद्ध धम्मदीक्षा समारंभ मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत.

 धम्मदीक्षा समारंभातील हिंदू धर्म सोडणाऱ्या विवेकी माणसांची संख्या धर्मवेढा माणसांच्या हृदयात धडकी भरवणारी आहे. त्यातूनच या दीक्षा समारंभात बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा म्हटल्याने वाद घडवून आणण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. हिंदू धर्मातील देव-देवतांना विरोध करणाऱ्या प्रतिज्ञा, त्यांना विटंबना करणाऱ्या वाटल्या. विशिष्ट धर्मातील, विशिष्ट देव नाकारणे एवढेच प्रयोजन या प्रतिज्ञांचे नाही. या प्रतिज्ञा प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. 'ईश्वर' हीच संकल्पना नाकारणे येथे अपेक्षित आहे. एकूणच दैववाद, अंधश्रद्धा नाकारून समतावादी, वैज्ञानिक दृष्टिकोन मान्य करणे, हे या प्रतिज्ञांचे प्रयोजन आहे. खरे तर हा वाद 22 प्रतिज्ञांचा नाही तर विषमतावादी धर्मास उच्चतम धर्म समजणाऱ्या मानसिकतेचा आहे. धर्माचा त्याग केल्याचा राग त्यात दडलेला आहे.

सद्या भारतात हिंदूधर्मरक्षक अशी प्रतिमा असलेल्या भाजपाचे शासन आहे. कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा असलेले नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री आहेत. हिंदुत्ववादी धार्मिक राजकारणास कधी नव्हे ते प्रचंड यश आलेले आहे. मात्र, असे असतानाही दुसरीकडे सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात घडत आहे. लोक हिंदू धर्म सोडत आहेत. देशाच्या राजधानीपासून ते अनेक शहरात ,खेड्या - पाड्यात हिंदू धर्म त्यागाचे सोहळे का होत आहेत ? याचे उत्तर हिंदु समाजाच्या जातीवस्थेत दडलेले आहे ! तसेच संविधानाने दिले अधिकार प्रत्यक्षात न येण्याचे कारण देखील जाती व्यवस्था आहे, जी उतरंडीच्या शोषण आणि गुलामीवर उभी आहे! माणूस आणि माणसाचे नाते हिंदू धर्मात समान नाही, हे हळूहळू सर्वांना लक्षात येऊ लागले आहे! ब्राह्मणी वर्चस्वातुन मुक्ती ही हिंदू धर्मातून बाहेर पडल्याशिवाय शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच धम्मदीक्षा समारंभ मोठया प्रमाणावर घडून येत आहेत ! 
  ( युवराज सोनवणे ( बीड) हे परिवर्तवादी साहित्याचे अभ्यासक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
-----

1 टिप्पणी:

  1. माणसाच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत शोषणाची व्यवस्था थांबणार नाही. दुःखाची व्यवस्था थांबणार नाही............. सणसणीत चपराक आणि निर्भीड लिखाण ... ...... !!

    उत्तर द्याहटवा

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.