ट्रम्प यांच्या टीकेला भारत आणि रशियाचे सडेतोड प्रत्युत्तर!
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व रशियाच्या अर्थव्यवस्थेला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणत जोरदार टिकास्त्र सोडल्यानंतर भारत आणि रशियाने याला ठाम प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तसेच रशियासोबतच्या व्यापारासाठी भारतावर दंड आकारण्याचाही इशारा दिला होता.
या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असताना भारताने संयमित पण ठाम भूमिका घेत ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर दिलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं की, "भारताचे विविध देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध हे त्यांच्या स्वतःच्या मूल्यांवर आधारित आहेत. कोणताही तिसरा देश या संबंधांवर प्रभाव टाकू शकत नाही."
जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, "भारत आणि रशिया हे दीर्घकाळपासूनचे स्थिर भागीदार आहेत. संरक्षण खरेदी असो वा धोरणात्मक सहकार्य, भारताचे निर्णय हे राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांवर आणि धोरणात्मक मूल्यांकनावर आधारित असतात." त्यांनी यावेळी अमेरिका आणि भारतातील संबंधही दृढ राहतील असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानावर रशियाकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. "ज्यांना ट्रम्प 'मृत' म्हणतात, त्यांनी त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करावं. रशियाकडे असलेल्या अणु क्षमतेची आठवण ट्रम्प यांनी ठेवावी," अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे अमेरिका, भारत आणि रशिया यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र भारत आणि रशिया दोन्ही देशांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत आपली भूमिका मांडत या प्रकरणावर आपली स्थिर भूमिका दर्शवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत