बीड : कंकालेश्वर मंदिर सौंदर्याचा अनोखा ठेवा! शिल्पकलेत लढणाऱ्या स्त्रिया आणि ग्रीक शैलीचा प्रभाव!
बीड, : चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याच्या कारकिर्दीत म्हणजेच इ.स. १० ते ११ व्या शतकात उभारण्यात आलेल्या कंकालेश्वर मंदिरात अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला पाहायला मिळते. हे मंदिर चौकोनी छोट्या तलावाच्या मध्यभागी आहे ,म्हणजेच चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. इतिहासकारांच्या मते, हे भव्य मंदिर चालुक्य राजवटीत बांधले गेले असून त्यात तत्कालीन समाजजीवनाचे, विशेषतः स्त्रियांच्या सहभागाचे अत्यंत सुंदर प्रतिबिंब उमटले आहे.
या मंदिरावरील शिल्पांमध्ये लढणाऱ्या स्त्रियांचे विविध पोझमधील शौर्यदर्शक आकृतीचित्रण आढळते. चालुक्य काळातील स्त्रिया युद्धात सक्रियपणे भाग घेत असत, याचा पुरावा या मंदिराच्या भिंतींवरील कलाकृतीतून मिळतो. हे शिल्पकाम तत्कालीन समाजातील स्त्रीसशक्तीकरणाची साक्ष देणारे आहे.
विशेष म्हणजे, या मंदिरातील काही स्तंभांवर आणि कलाकृतींमध्ये ग्रीक शिल्पकलेची छाप दिसून येते, जे दर्शवते की त्या काळी विविध संस्कृतींचा प्रभाव द्रविड स्थापत्यकलेवर पडत होता.
हिंदू धर्मासोबतच जैन धर्माचाही या मंदिरावर प्रभाव जाणवतो. आर्यनाथ आणि नेमिनाथ या जैन तीर्थंकरांची शिल्पं मंदिरावर आढळतात, ज्यामुळे या वास्तूची धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता अधोरेखित होते.
कंकाळेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, ते इतिहास, शिल्पकला आणि संस्कृती यांचे अद्वितीय मिश्रण दर्शवणारे जिवंत उदाहरण आहे. बीड जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाचे हे मंदिर आजही पर्यटकांसाठी आणि संशोधकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत