Header Ads

महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार; उद्या तातडीची बैठक

 


कोल्हापूर : नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील 'महादेवी' या हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकात तीव्र जनआंदोलन पेटले आहे. विविध आंदोलनांद्वारे लोक भावना व्यक्त करत असून या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, महादेवीला गुजरातमधील रिलायन्स समूहाच्या 'वनतारा' या वनप्रकल्पात हलवण्यात आले आहे. वनताराकडून हत्तीणीची प्रकृती स्थिर असून ती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, लोकभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "महादेवी हत्तीणीच्या प्रकरणावर उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन काय मार्ग काढता येईल, यावर चर्चा केली जाईल."

फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, "हत्तीणीच्या स्थलांतराबाबत सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. मात्र, जनतेच्या भावना आम्ही नजरेआड करू शकत नाही. कायदेशीर मार्गांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल."

'वनतारा'नेही स्पष्ट केलं आहे की, हत्तीण परत पाठवण्यासाठी वन्यजीव विभाग आणि जैन मठाने न्यायालयात याचिका दाखल करून संमती मिळवावी लागेल.

सध्या जनभावना आणि कायदेशीर अडचणी या दोघांमधील समतोल राखत महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्याची बैठक या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.