Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

राज्यातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता; कोकाटे यांचे खाते जाण्याची चिन्हे, शिरसाट यांना डच्चू?


मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच मोठे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘रमी’ प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले जाणार असल्याचे समजते. तर शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह काही इतर मंत्र्यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत सलग दोन दिवस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत २५ मिनिटांची महत्त्वपूर्ण चर्चा केली. याशिवाय, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही फडणवीस यांनी सविस्तर संवाद साधला.

याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “हा दौरा पूर्णतः राज्याच्या विकासप्रकल्पांसाठी होता.” मात्र, मंत्रिमंडळातील सातत्याने घडणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याने, फेरबदल अपरिहार्य असल्याचे सरकारमधीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाने जोरदार आंदोलन छेडले आहे. पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. फडणवीस यांनीही कृषी मंत्रालयात जाऊन चौहान यांच्याशी यावर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटातील इतर वादग्रस्त मंत्र्यांबाबतही फडणवीस यांनी अमित शहांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.