बीडमध्ये दोन कुख्यात आरोपी अटकेत, घरफोडयांचा पोलिसांनी लावला छडा
बीड : जिल्ह्यातील बर्दापूर परिसरात जानेवारी महिन्यात झालेल्या सलग तीन घरफोड्यांचा छडा लावत बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन कुख्यात आरोपींना अटक केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
जानेवारी २०२५ मध्ये पोलीस ठाणे बर्दापूर हद्दीत मौजे गिरवरी, जवळगाव आणि बर्दापूर येथे बंद घरे फोडून चोरी झाल्याचे प्रकार घडले होते. तांत्रिक तपासाद्वारे आरोपींची नावे उघडकीस आली होती. मात्र आरोपी फरार होते.
दिनांक २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी माने कॉम्प्लेक्स, बीड येथे थांबले आहेत. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे शेख ईरफान मुनीर (वय २१ वर्ष),आणि मुस्तफा कासिम पठाण (वय २७ वर्ष) (दोघेही रा. अंबेडकर चौक, पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) अशी आहेत.
चौकशीत त्यांनी जानेवारीमध्ये घडलेल्या तीनही घरफोड्यांची कबुली दिली असून त्यांनी सोनं, रोख रक्कम व इतर माल चोरून नेल्याचं उघड झालं आहे. त्यांच्या अटकेने बर्दापुर पोलीस ठाण्यातील एकूण ३ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
सदर आरोपी हे पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड येथे ३ गुन्हे ,नांदेड ग्रामीण येथे१ गुन्हा, रेणापूर येथे१ गुन्हा तर परळी ग्रामीण येथे१ गुन्हा दाखल आहे.
या कारवाईस पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड (स्थानीय गुन्हे शाखा, बीड) यांचे मार्गदर्शन लाभले. कारवाईत सपोनि सिध्देश्वर मुरकुटे, पो.ह. विकास राठोड, राहुल शिंदे, नितीन वडमारे, पो.अं. आशपाक सय्यद, मनोज परजणे, नारायण कोरडे या अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
दोघा आरोपींना पुढील तपासासाठी बर्दापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि ससाणे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत