Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

मरळवाडी खून प्रकरणात नवे वळण: महादेव गीतेचा गंभीर आरोप, पत्नीचा आत्मदहनाचा इशारा


परळी (प्रतिनिधी)

 परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात आता नवे वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी महादेव गीतेने अंबाजोगाई न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाल्यानंतर, पोलिस वाहनातून परत जाताना गंभीर आरोप करत सांगितले की, "आमच्यावर खोटा खुनाचा आरोप लावून आम्हाला मारहाण करून जबरदस्तीने या प्रकरणात अडकवण्यात आले. खुनाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड असून, त्याला सोडून दिले गेले आहे."

गीतेच्या या आरोपामुळे पोलिस तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, महादेव गीतेच्या पत्नीने देखील प्रसारमाध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले, "माझ्या पतीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ते पूर्णपणे निर्दोष आहेत. तरीसुद्धा त्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर मी आत्मदहन करू."

ही प्रतिक्रिया प्रकरणाच्या गंभीरतेत आणखी भर घालणारी ठरत आहे.

बापू आंधळे यांची हत्या २९ जून २०२४ रोजी परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून करण्यात आली होती. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. जुन्या आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल आहे. मात्र, वर्षभर उलटूनही बबन गीते अद्याप फरार आहेत.

दरम्यान, बीड कारागृहात महादेव गीते व त्यांच्या सहकाऱ्यांचा वाल्मीक कराडसोबत वाद झाल्यानंतर त्यांना हर्मूल कारागृहात हलवण्यात आले. यामुळे कारागृह व्यवस्थापन आणि पोलिस तपास यांच्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रकरणातील वाढते आरोप आणि न्यायप्रक्रियेतील विलंब यामुळे परळी तालुक्यात संतापाची लाट उसळू लागली आहे. आता न्यायालयीन यंत्रणेची पुढील पावले या प्रकरणात निर्णायक ठरणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.