डेनव्हर विमानतळावर थरार: उड्डाणाआधीच विमानात लागली आग
प्रवाशांची थरारक सुटका
---
डेनव्हर (अमेरिका): अमेरिकेतील डेनव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात मोठी दुर्घटना टळली. AA3023 या बोईंग 737 मॅक्स 8 विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले आणि विमानातून आपत्कालीन मार्गाने प्रवाशांना बाहेर काढावे लागले.
विमान डेनव्हरहून मियामीकडे जाण्याच्या तयारीत असताना अचानक टायरमध्ये मेंटेनन्ससंबंधी तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर विमानातून धुराचे लोट बाहेर पडू लागले आणि काही वेळातच विमानात आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
घटनेवेळी विमानात १७३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे इव्हॅक्युशन शूट्सच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पाच जणांवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले.
ही घटना घडताना चित्रीत झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रवासी घसरत स्लाइडवरून खाली येताना आणि धुराने वेढलेल्या विमानापासून दूर पळताना दिसत आहेत. काही प्रवाशांनी घटनेचा अनुभव सांगताना म्हटले, "विमान टेकऑफच्या तयारीत असतानाच अचानक थांबले, त्यानंतर धूर दिसू लागला आणि लोकांनी घाईघाईने बाहेर पडायला सुरुवात केली."
अमेरिकन एअरलाइन्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून, या घटनेची तपासणी सुरू आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत