Header Ads

हरिद्वार : मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू; अनेक भाविक जखमी

हरिद्वार : हरिद्वारमधील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी चेंगराचेंगरीची घटना घडली, यात सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावर पोलिस व प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.


या दुर्घटनेबाबत माहिती देताना गढवाल डिव्हीजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माध्यमांना सांगितले की, "हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मी घटनास्थळाकडे निघालो आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल अद्याप येणे बाकी आहे."


आयजी कायदा व सुव्यवस्था निलेश भारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भाविक मंदिराकडे जात असताना विजेच्या धोक्याबाबत अफवा पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांनी एकाच वेळी धावपळ केल्याने चेंगराचेंगरी झाली. सद्यस्थितीत आम्ही तपास करत असून, बचाव व मदतकार्य सुरू आहे."


दरम्यान, जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. व्हिडीओ फूटेजमध्ये जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसून आले आहे.


मनसा देवी मंदिर हे हरिद्वारच्या पंचतीर्थांपैकी एक असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर शिवालिक पर्वतरांगांमध्ये ५०० फूट उंचीवर वसलेले असून, विशेषतः धार्मिक सणांवेळी येथे प्रचंड गर्दी होते.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.