Header Ads

निर्मिती सावंत पुन्हा छोट्या पडद्यावर! 'पारू' आणि 'लक्ष्मी निवास'च्या महासंगमात कोल्हापुरी 'पद्मावती'ची दमदार एन्ट्री

मराठी नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये आपल्या अभिनयानं स्वतंत्र छाप पाडणारी आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री निर्मिती सावंत आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. 'नवरा माझा नवसाचा २', 'झिम्मा २' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांनंतर निर्मिती सावंत आता ‘झी मराठी’वरील खास मालिकांच्या महासंगमात एका हटके भूमिकेत दिसणार आहेत.

'कुमारी गंगुबाई नॉन-मॅट्रिक' या मालिकेतील त्यांच्या आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. ‘फू बाई फू’, ‘जाडूबाई जोरात’, ‘१७६० सासूबाई’ अशा अनेक मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने हसवणं आणि विचार करायला लावणं, हे दोन्ही एकाचवेळी केलं. आता, मोठ्या ब्रेकनंतर निर्मिती सावंत पुन्हा एकदा नव्या जोशात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन मालिकांचा महासंगम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या विशेष भागात निर्मिती सावंत ‘पद्मावती’ या दमदार कोल्हापुरी व्यक्तिरेखेत एन्ट्री घेणार आहेत. नऊवारी साडी, नथ, गजरा, मोठं कुंकू, झळझळीत दागिन्यांनी सजलेली, तेजस्वी आणि रुबाबदार अशी पद्मावती, अहिल्यादेवी आणि लक्ष्मीच्या आयुष्यात धुमाकूळ घालणार आहे.

प्रोमोनुसार, पद्मावती या दोघींनाही एक मोठं चॅलेंज देते. त्या तिघींचं एकमेकींशी काय नातं आहे? पद्मावतीचं आगमन त्यांच्या आयुष्यात कोणते वळण आणणार आहे? याचा थरारक उलगडा लवकरच मालिकांच्या महासंगमाच्या खास भागांमध्ये होणार आहे.

प्रेक्षकांना नव्याने उत्सुकता निर्माण करणारा आणि निर्मिती सावंत यांच्या पुनरागमनाला सलामी देणारा हा महासंगम नक्कीच गाजणार, यात शंका नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.