बीडमध्ये गुंडगिरीवर कडक कारवाई! MPDA अंतर्गत दहशत निर्माण करणारा सोहेल खान स्थानबद्ध
बीड : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सोहेल खान समद खान (वय 27, रा. जुनी भाजीमंडई, बीड) याला MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे बीड शहरचे निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिनांक 14 जून 2025 रोजी सोहेलविरुद्ध प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 26 जुलै 2025 रोजी MPDA अंतर्गत कारवाईचे आदेश पारित केले.
7 गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सोहेलविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जिवे मारण्याच्या धमक्या, मारहाण, शिवीगाळ आदी आरोप आहेत. यापैकी 5 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 2 प्रकरणे तपासाधीन आहेत. तो बशीरगंज, सुभाष रोड, बलभीम चौक, कारांजा, राजुरीवेश परिसरात दादागिरी करत असलेल्या तक्रारींमुळे अनेक नागरिक भयभीत होते.
याआधी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी त्याच्यावर BNSS कलम 129 अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, तो गुन्हेगारी वर्तणुकीत सुधारणा न करता पुन्हा गुन्ह्यांत सक्रिय झाला.
पोनि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. सिध्देश्वर मुरकुटे यांचे पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 26 जुलै रोजी सोहेलला अटक केली आणि 27 जुलै रोजी पहाटे 2.30 वाजता त्याला हर्सुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी शिवाजी बंटेवाड, तसेच पोनि. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनि बाबा राठोड, पोह. सचिन अलगट, महादेव दराडे, गणपती राऊत, आणि स्थागुशाचे पोउपनि. सिध्देश्वर मुरकुटे, आदींचा सक्रिय सहभाग होता.
पोलीस अधीक्षक काँवत यांनी पुढील काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर MPDA अंतर्गत आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषतः वाळू माफिया, मटका-जुगार, खंडणीबहाद्दर गुंड, तसेच काळाबाजार करणाऱ्यांविरोधात पोलिसांची नजर अधिक तीव्र असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत