Header Ads

पुणे: हॉटेल पार्टीवर छापा, अमली पदार्थ प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांना अटक

पुणे – खराडी परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रात्रीच्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत कोकेन, गांजा, मद्य, हुक्का आणि इतर प्रतिबंधित वस्तूंसह दोन तरुणींसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर यांचा समावेश आहे.

पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींची नावे डॉ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग आणि प्राची गोपाल शर्मा अशी आहेत.

या आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का सेट, सुगंधी तंबाखू, मद्याच्या बाटल्या, दोन चारचाकी वाहने, दहा मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावली आहे.

गुन्हे शाखेचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना ‘स्टे बर्ड अझुर’ हॉटेलमधील खोलीत पार्टी सुरू असल्याची आणि तिथे अमली पदार्थ वापरले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली आणि पार्टीतील सर्व संशयितांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात एनडीपीएस (अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींची एकमेकांशी ओळख पुण्यातील 'पार्टी कल्चर'मधून झाली असून, ते नियमित संपर्कात होते. यापैकी पोपटाणी हा सिगारेट वितरक, सय्यद याचा हार्डवेअरचा व्यवसाय तर यादव हा बांधकाम व्यावसायिक आहे. डॉ. खेवलकर यांच्या घरीही छापा टाकून लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अमली पदार्थ पुरवणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.