शिवसेनेचा जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर, कुंडलिक खांडे वर गुन्हा दाखल
राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा तस्करी प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मागच्या वर्षी खांडे यांच्या मालकीच्या जागेत पत्त्याचा क्लब आढळला होता. मात्र, सदर जागा ही त्यांनी भाड्याने दिल्याचे सांगीतले होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी धाडसी कारवाई करत ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत ताब्यात घेतलेल्या गुटखा विक्रेत्याने चौकशीत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव घेतल्याने त्यांचा आरोपीत समावेश झाला आहे.
केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी केज तालुक्यातील नांदूरघाट येथे दोन ठिकाणी छापे मारले. त्यानंतर बीडमधील दोन गोदामांचीही त्यांनी झडती घेतली. मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत रामेश्वर कानडे याच्या दुकानावर छापा टाकला. याशिवाय, रामहरी वैजीनाथ जाधव याच्या दुकानावरही छापा टाकला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चंद्रकांत कानडे याने अन्य तिघांकडून हा गुटखा आल्याचे सांगितले, तर जाधवने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार, केज ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले. दरम्यान, चंद्रकांत कानडेकडे आढळलेल्या गुटख्याचे धागेदोरे गुटखा माफिया महारुद्र मुळे, शेख वसीम शेख सिराज व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यापर्यंत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे आरोपींच्या यादीत कुंडलिक खांडे यांचेही नाव समाविष्ट झाले.
चंद्रकांत कानडे याने चौकशीत दिलेल्या माहितीवरून सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीडमधील इमामपूर रोडवरील गोदामात व जालना रोडवरील एका गोदामात रात्री आठ ते नऊ दरम्यान धाडी टाकल्या. यावेळी १२ लाख किमतीचा टेम्पो (एम. एच. २६ बी. ई.- १९२६) व २० लाख रुपयांचा गुटखा, जाधव प्रकरणात एक लाख ९७ हजार रुपयांचा गुटखा असा सुमारे ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकिकडे गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आल्याने खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे गुटखा माफिया महारुद्रमुळे याच्यावर अडीच महिन्यांत गुटखा प्रकरणातील हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्वी पिंपळनेर ठाणे हद्दीतील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ६२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. यात महारुद्र मुळे मुख्य आरोपी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत